पुणे : ज्येष्ठ नागरिकाला मधुमोहजालात (हनीट्रॅप) अडकवून त्याच्याकडून ३० लाखांची खंडणी उकळणाऱ्या महिलेसह साथीदाराला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून २३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्योती बनसोडे उर्फ ज्योती नितीन अहिवळे, साथीदार रामचंद्र बापू कोरडे (दोघे रा. डाॅ. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तक्रारदार ज्येष्ठाच्या ओळखीतील महिलेने आरोपी ज्योतीशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर ओळखीतील महिलेने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ज्योतीला चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. तिच्या मोबाइल संचात तुमचा मोबाइल क्रमांक आढळून आला आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील, अशी भीती महिलेने ज्येष्ठाला दाखविली होती. त्यानंतर आरोपी रामचंद्र कोरडेचे नाव चोरीच्या गुन्ह्यात टाकून तुम्हाला वाचविते. त्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील, अशी सांगून ज्येष्ठाकडून वेळोवेळी ३० लाख रुपये घेतले.
हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील ७२ गावे धोकादायक
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड मल्टीप्लेक्सजवळील गल्लीत बोलावून पोलीस आाणि न्यायालयीन कामकाजासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील, तसेच दरमहा एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी पुन्हा त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपींच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. आरोपी ज्योती आणि साथीदार रामचंद्र यांनी ज्येष्ठाकडून घेतलेल्या खंडणीची रक्कम एका बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवल्याचे तपासात उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, किशोर पोटे, नागेश पिसाळ, अमित जाधव आदींनी तपास करुन आरोपींना अटक केली.