पुणे : बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, हवालदार नीलम कर्पे, माया गाडेकर, योगिता आफळे, दोन महिला पोलीस शिपाई, तसेच अक्षय जीवन आवटे (वय ३१, रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (वय ३०, रा. साततौटी चौक, कसबा पेठ), सुजीत पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”
तक्रारदार महिलेने बलात्कार प्रकरणी आरोपी सुजीत पुजारी, आदित्य गौतम यांच्याविरुद्ध मार्च २०२३ मध्ये तक्रार दिली होती. पती अक्षय आवटे याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पुजारी, गौतम, आवटे यांच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले होते. २३ मार्च २०२३ रोजी महिलेला समर्थ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. पती अक्षय, त्याचे मित्र पुजारी आणि गौतम यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. समर्थ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात बोलाविले. पोलीस ठाण्यात मला उपनिरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला.
हेही वाचा…विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; वडगाव शेरी परिसरातील घटना
आरोपी पुजारी, गौतम सोमवार पेठेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला धमकावले. माझ्याकडे पाहून ते थुंकले, असा आरोप महिलेने फिर्यादीत केला आहे. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.