पुणे : सिंहगड रस्त्यावर महापालिकेकडून सुरू असलेल्या राजाराम पूल ते फन टाइम चित्रपटगृह उड्डाणपूल उभारणीच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे. हा उड्डाणपूल संपून खाली उतरत असलेल्या मार्गांमध्ये मेट्रो मार्गाचे ३९ खांब येत आहेत. या खांबांची उभारणी आता दोन सरकारी यंत्रणांतील विसंवादामुळे रखडली आहे. त्यावरून महापालिका आणि महामेट्रो एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेकडून उड्डाणपूल उभारणी करण्याआधी महामेट्रोकडून तेथून जाणाऱ्या मेट्रो खांबांच्या रचनेचे अहवाल मागविण्यात आले होते. उड्डाणपूल जिथून खाली उतरेल त्या मार्गांमध्ये येणारे मेट्रोचे खांब जमिनीच्या पातळीपर्यंत महापालिका उभारणार आहे. याबाबत महापालिकेने २१ नोव्हेंबर २०२२ रोजी महामेट्रोकडून या खांबांची रचना कुठे आणि कशी असेल, याचा आराखडा मागविला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आतापर्यंत आठ खांबांचे अहवाल मिळाले, असे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार खासगी विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना

विशेष म्हणजे मेट्रोचे खांब जमिनीच्या वर एक मीटर ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. नंतर महापालिकेला ही चूक लक्षात आली. कारण या खांबांमुळे वाहतुकीला अडथळा होणार होता. त्यामुळे ते खांब जमिनीच्या समांतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुन्हा काही खांबांची रचना बदलली. याच वेळी खांबांची उभारणी जिथे करावयाची आहे तेथील भूगर्भ तपासणी अहवाल महापालिकेकडून महामेट्रोला मिळणे अपेक्षित होते. महापालिकेने ३९ खांबांचे भूगर्भ तपासणी अहवाल महामेट्रोला पाठविल्याचा दावा केला आहे. मात्र, महापालिकेकडून १० ते १२ भूगर्भ तपासणी अहवाल मिळाले असून, त्यानुसार तातडीने तेवढ्या खांबांचे रचना अहवाल दिल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.

हेही वाचा : मेट्रोच्या कामामुळे औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल

हा उड्डाणपूल मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कामाला होत असलेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांनी वाढत आहे. त्याचबरोबर कामही १०० टक्के क्षमतेने होण्याऐवजी ८० टक्के क्षमतेनेच करता येत आहे. मेट्रोची खांब उभारणी सुरू केल्याशिवाय उड्डाणपूल खाली उतरणार असलेल्या मार्गाचे काम सुरू करता येत नाही. महामेट्रोकडून खांबांच्या रचनेचे अहवाल न मिळाल्याने कामाला विलंब होत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

मुख्य अभियंत्यांनी जबाबदारी झटकली

महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांच्याकडे याबाबत माहिती मागितली असता, त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. नंतर त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावरून मुख्य अभियंताच याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : पिंपरी :महापालिका ठेकेदारावर मेहरबान; मोशी रुग्णालयाच्या वाढीव दराच्या निविदेला प्रशासनाची मान्यता

“महापालिकेकडे १० ते १२ मेट्रो खांबांचे भूगर्भ तपासणीचे अहवाल मिळाले आहेत. त्यानंतर लगेचच या खांबाचे रचना अहवाल महापालिकेकडे पाठवले आहेत. महामेट्रोमुळे उड्डाणपुलाच्या कामाला कोणताही विलंब झालेला नाही.” – अतुल गाडगीळ, संचालक, महामेट्रो

“महामेट्रोकडून आतापर्यंत आठ खांबांचे रचना अहवाल मिळाले आहेत. त्यांपैकी तीन अहवाल सुधारित मागविण्यात आले आहेत. उड्डाणपूल उतरणारा भाग तयार नसल्याने बांधकामाचे साहित्य वर नेण्यास अडचणी येत आहेत.” – पवन मापारी, उपअभियंता, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune work of bridge on sinhagad road is delayed due to dispute between pune municipal corporation and mahametro pune print news stj 05 css