पुणे : पत्र्याच्या शेडचे काम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे भागात घडली. दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला. कामगारांना सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरुन ठेकेदाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विलास बाबुराव पांचाळ (वय ६२, रा. आनंदप्रभात अपार्टमेंट, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. दुर्घटनेत पांडुरंग बाबुराव काळे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ठेकेदार सुरेश अरविंद पांचाळ (वय ६३, रा. सहयोगनगर, वारजे) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विशाल खटावकर (वय ४२) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : एकतर्फी प्रेमातून युवतीचे अपहरण, नवी मुंबईतून युवतीची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार सुरेश पांचाळ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. विलास पांचाळ, पांडुरंग काळे हे त्यांच्याकडे कामाला आहेत. नऱ्हे भागातील वरद एंटरप्रायजेस येथे पत्र्याची शेड उभी करण्याचे काम ठेकेदार सुरेश पांचाळ यांना देण्यात आले होते. गुरुवारी दुपारी शेडचे काम विलास पांचाळ, पांडुरंग काळे, सुंरेश पांचाळ, मंगेश विश्वकर्मा काम करत होते. त्यावेळी बारा फूट उंचीवरुन पांचाळ, काळे, विश्वकर्मा पडले. तोल जाऊन पडल्याने विलास पांचाळ आणि पांडुरंग काळे यांना गंभीर दुखापत झाली, तसेच दुर्घटनेत सुरेश पांचाळ, मंगेश विश्वकर्मा यांना दुखापत झाली. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच विलास पांचाळ यांचा मृत्यू झाला होता. पांडुरंग काळे यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune worker dies after fell down while working on shed other three injured pune print news rbk 25 css