पुणे: पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात ललित पाटील या आरोपीला अटक केली होती. त्या आरोपीला अटक केल्यानंतर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तो आरोपी ससून रुग्णालयामधून पळून गेल्याची घटना घडल्यानंतर आरोपीला मदत करणाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकून हजारो कोटींचा ड्रग्सचा साठा देखील जप्त केला होता. या सर्व घटना थांबत नाही. तोवर पुणे शहरातील सततचा वर्दळीचा आणि सर्वाधिक हॉटेलची संख्या असलेल्या फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले दारू पिताना, तर बाथरूममध्ये ड्रग्सचे सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर संबधीत विभागाचे मंत्री, हॉटेल चालक, प्रशासनातील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

हेही वाचा : ‘त्या’ विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्तीचा लाभ… काय आहे योजना?

शंभूराज देसाई हे कसाई सारखे वागतात : आमदार रविंद्र धंगेकर

पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पब हे चालविले जात आहेत. या विरोधात पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती. आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु असे आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. तर येणार्‍या अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा : पुणे : विधानसभा फॉर्म्युला ठरला! जिल्ह्यात एक तर ताकद असलेल्या ठिकाणी दोन जागा मागणार- सचिन अहिर

शंभुराज देसाई यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा : सुषमा अंधारे

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून ड्रग्स प्रकरणी भूमिका मांडत आहे. मात्र सत्तेच्या बळावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. धमक्या दिल्या जातात, अब्रूनुकसानीचे दावे करू यासह अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. तसेच आजचा एका हॉटेल मधील व्हिडीओ समोर आल्याने उत्पादन शुल्क विभागाची अब्रू चव्हाटय़ावर आली आहे. त्यामुळे शंभुराज देसाई आपण कोणावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहात, तसेच अमली पदार्थांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात, शंभुराज देसाई अपयशी ठरले असून त्यांनी राजीनामा द्यावा, त्याच बरोबर पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे राजपूत यांना निलंबित करून कारवाई करावी अशी मागणी देखील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे.त्या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॅाटेलचे चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही.

मुरलीधर मोहोळ (केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री)

दरम्यान, पुण्यातील एफ सी रोडवर असलेल्या लिक्वीड लीजर लाउंज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक यासह अन्य दोघे असे मिळून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच हॉटेल मधील सर्व साहित्य जप्त करण्यात येत आहे.