पुणे : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी पठाण मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राची मोबाइलवरुन छायाचित्रे काढली. तरुणीला धमकावून त्याने तिला मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर मोटार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पठाण पसार झाला.
घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून पठाणला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शबाना शेख तपास करत आहेत.
हेही वाचा : शिक्षण विभागाने सुटका करूनही शिक्षक बीएलओ कामात अडकलेलेच
शाळेच्या प्रशासकाकडून महिलेचा विनयभंग
कोरेगाव पार्क भागातील एका शाळेच्या प्रशासकाने कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी प्रशांत पुष्टी (वय ५२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने महिलेशी अश्लील वर्तन केले. माझे ऐकले नाही तर शाळेतून काढून टाकेन, अशी धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.