पुणे : विवाहनोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करून आरोपीने तरुणीला बँकेकडून कर्ज काढण्यास भाग पाडले. तरुणीची २६ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अमित चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने एका विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपी चव्हाण याने रोहित राजाराम देशमुख या नावे विवाहनोंदणी संकेतस्थळावर माहिती दिली होती.
आयात-निर्यात व्यवसाय असल्याचे त्याने माहितीत नमूद केले होते. त्यानंतर तरुणी आणि आरोपी चव्हाण संपर्कात आले. चव्हाण याने तिला विवाहाचे आमिष दाखवून भेटायला बोलावले. त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीची छायाचित्रे काढली. त्यानंतर त्याने तरुणीवर पुन्हा बलात्कार केला. आयात-निर्यात व्यवसायात मोठा तोटा झाल्याचे सांगून त्याने तिला कर्जप्रकरण करण्यास सांगितले.
हेही वाचा : सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘माझ्याविरोधात कोणी तरी लढलेच पाहिजे!’
तरुणीने एका बँकेकडून २६ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज काढून चव्हाणला दिले. कर्जाचे हप्ते मी भरतो, असे त्याने तिला सांगितले होते. चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.