पुणे : किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर भागात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश अनिल कुंभार (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय आबासाहेब सरोदे, भु्त्या उर्फ रोहित बाबासाहेब काते (दोघ रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यश याची आई मंजू अनिल कुंभार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : पुणे : वाढदिवसाच्या दिवशी इमारतीत आग, अग्निशमन दलाकडून बालकासह पाच महिलांची सुटका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश याचा आरोपी अक्षय आणि रोहित यांच्याशी वाद झाला होता. यश, त्याचे मित्र निखिल भिसोरे, कैलास बनसोडे हे सोमवारी गुलटेकडीतील कटारिया शाळेसमोर मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी अक्षय आणि रोहित तेथे आले. त्यांनी यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. यश याच्या पाठीवर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील तपास करत आहेत.