पुणे : गणेशोत्सव काळात दहा दिवस तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. एक दिवस उत्सव साजरा करून नऊ दिवस तरुणांनी सरकार, प्रशासन पोहचलेले नाही अशा ठिकाणी जाऊन विधायक कामे केली पाहिजेत, असे परखड मत तरुण लेखक, विचारवंत सुरज एंगडे यांनी व्यक्त केले. एंगडे यांचे कास्ट मॅटर्स, हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. त्यानिमित्त थेट-भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचकांशी संवाद साधताना एंगडे म्हणाले, शहरांपासून खेड्यापर्यंत आता दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या काळात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. राज्यातील तरुणांनी एक दिवस गणेशोत्सव साजरा करून नऊ दिवस सरकार पोहचले नाही, अशा ठिकाणी जाऊन रस्ते, पूल, शाळा, दवाखाने उभारणे आणि या पायाभूत सार्वजनिक सोयी सक्षम करण्याचे काम करावे. गणेशभक्तांनी हे गणेशाच्या नावानेच करावे. पण, विधायक कामे केली पाहिजेत.

हेही वाचा : गणेशोत्सवात पुणेकरांना मिळणार पावसाचे दररोज विशेष अंदाज; जाणून घ्या कसे?

आपल्याकडे अलिकडे सर्वच महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करताना विधायक कामांचा विसर पडलेला दिसून येतो, हे समाज हिताचे नाही. लोकमान्य टिळकांनी पुरोगामी विचाराने, समाज सुधारणेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. पण, ते मूळ स्वरुप, हेतू आता हरवला आहे. सण-उत्सवांना आता मूळ धार्मिक स्वरुप राहिले नाही, त्यात राजकारण शिरले आहे. सण-उत्सवांना जाणीवपूर्वक राजकीय स्वरुप दिले जात आहे, असेही एंगडे म्हणाले.

हेही वाचा : पुण्यात गणेशोत्सवामध्ये अग्निशमन दलाकडून अग्निसुरक्षित गणेश मंडळ स्पर्धा

तरुणाईने चळवळशी जोडून घेतले पाहिजे

आजच्या तरुणाईने कोणत्या ना कोणत्या चळवळीशी थेट जोडून घेतले पाहिजे. काठावर उभे राहून फक्त मत प्रदर्शन करण्याऐवजी थेट चळवळीत सक्रिय झाल्यास त्याचा समाजाला उपयोग होईल. आंबेडकरी समाजातील तरुणांनी फक्त आंबेडकरी चळवळीतच सहभागी झाले पाहिजे, असे नाही. पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, प्राणी हक्क, वृक्ष संवर्धन, अशा कोणत्या ना कोणत्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. तरुणांनी वाचन आणि ऐकण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तुम्ही काहीही वाचा, चांगली व्याख्याने, चर्चा, वाद-विवाद ऐका, त्यातून तुमची जडणघडण होईल, असेही एंगडे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune young writer suraj yengde says labor force of youth is wasted during 10 days of ganeshotsav pune print news dbj 20 css