पुणे : ससून रुग्णालयातून मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या ललित पाटीलच्या साथीदारांना नुकतीच अटक करण्यात आली. तरुणांमध्ये अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, गेल्या दहा महिन्यांत पुण्यात १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांकडून मेफेड्रोनला सर्वाधिक मागणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आयटी सिटी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात परराज्यांतील नागरिकांचे स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारांकडून एक कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्यानंतर तरुणांमधील नशेखोरी चर्चेत आली आहे.

हेही वाचा : सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दहा महिन्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणी ७० गुन्हे दाखल केले असून, १०० जणांना अटक केली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांकडून मेफेड्रोनला सर्वाधिक मागणी आहे. त्याखालोखाल गांजा, चरस, कोकेन, ब्राऊन शुगर, अफू अशा अमली पदार्थांची विक्री शहरातील उच्चभ्रू भागात होते. अमली पदार्थांची तस्करी, तसेच विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.

हेही वाचा : पिंपरी महापालिकेत बढत्यांचा धमाका, एकाच दिवशी ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांना बढत्या

कोरेगाव पार्क, कोंढवा, विमाननगर भागात विक्री

शहरातील कोंढवा, विमाननगर, कोरेगाव पार्क, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अमली पदार्थांची विक्री केली जाते. अमली पदार्थांची नशा महाग असते. पुण्यात नोकरीसाठी आलेले माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण, तसेच शिक्षणानिमित्त आलेले विद्यार्थी अमली पदार्थ विक्रेत्यांचे सावज असतात. उच्चभ्रू भागातील हाॅटेल, पबच्या बाहेर अमली पदार्थ विक्रेत्यांचा वावर असतो. नशा करणारे तरुण त्यांच्या संपर्कात असतात.

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

अमली पदार्थाचे नाव जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत

मेफेड्रोन ७ कोटी ९१ लाख ९९ हजार

गांजा ३ कोटी ७ लाख ९० हजार

एलएसडी १ कोटी १२ लाख ६४ हजार

चरस ४८ लाख २ हजार

अफू ४७ लाख ८२ हजार

हेराॅईन ४६ लाख ८९ हजार

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune youth addicted to mephedrone drugs how smuggling of mephedrone drugs takes place in the city pune print news rbk 25 css