पुणे : भिवंडीत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बंडगार्डन पोलिसांनी ताडीवाला रस्ता परिसरातील सराईताला अटक केली. रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनावणे (वय २२, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भिवंडी शहरात १४ फेब्रुवारी रोजी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी करण हनुमंत लष्करे, दिनेश मारुती मोरे, चंदन उपेंद्रप्रसाद गौड, कैलास खंडू धोत्रे, आकाश परशुराम जाधव, विशाल विठ्ठल साबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या आरोपींचा भिवंडी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांना घटनास्थळावरचे सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच आरोपींचे छायाचित्र उपलब्ध झाले होते.
हेही वाचा : ‘राष्ट्रवादीने सिंचन, बँक घोटाळा केला ना? मग चौकशी करा’, मोदींना आव्हान देताना अजित पवारांची कोंडी
अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात ताडीवाला रस्ता परिसरात सराईत रामनाथ सोनावणे सामील झाल्याची माहिती तपासत मिळाली. तो ताडीवाला रस्ता परिसरातील नदीकिनारी शंकर मंदिराजवळ थांबला होता. या बाबतची माहिती तपास पथकाला मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे यांनी ही कारवाई केली.