पुणे : पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे न घेतल्याने तिघांनी एकावर कोयत्याने वार केल्याची घटना एरंडवणे भागात घडली. याप्रकरणई तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल अशोक बानगुडे (वय ४०, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. बानगुडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी यश राजेश कंधारे (वय २२, रा. रतनदीप सोसायटी, पटवर्धन बागेजवळ, एरंडवणे), ओम राजेश कंधारे (वय १८) आणि राजेश विठ्ठल कंधारे (वय ५०, रा. एरंडवणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा : CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
बानगुडे आणि आरोपी यांच्यात वाद झाले होते. गुरुवारी सायंकाळी बानगुडे भालेकर वस्ती परिसरातील गणेश मंदिराजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी यश कंधारे तेथे आला. ‘आमच्या विरोधात दिलेली तक्रार मागे का घेत नाही़, आमच्या नादी लागतो का ?’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी ओम कंधारे आणि राजेश कंधारे दुचाकीवरुन तेथे आले. बानगुडे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. जखमी अवस्थेत बानगुडे तेथून पळाले. तेव्हा आरोपी राजेशने त्यांचा दुचाकीवरुन पाठलाग केला. ‘तुझ्याविरुद्ध सोनसाखळी चोरीचा खोटा गु्न्हा दाखल करू’, अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपी कंधारे यांना अटक केली असून,उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.