पुणे : रस्त्याने जाणाऱ्या तरुणाला अडवून लुटण्याचा प्रयत्न केला असता, तरुणाने विरोध केल्यावर लोखंडी वस्तूने डोक्यात घाव घालून जखमी केल्याचा प्रकार विमाननगर येथे घडला. प्रकाश दीपक थापा (वय ३०, रा. यशोदा नंदन सोसायटी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (५ फेब्रुवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विमाननगर परिसरातील यशोदानंदन सोसायटी येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतो आणि तेथेच राहायला आहे. कामानिमित्त तरुण सोसायटीच्या बाहेर गेला होता. त्यावेळी अज्ञात तरुणाने त्याला अडवले आणि ‘तुझ्याकडे जे जे आहे ते मला काढून दे,’ असे बजावले. अज्ञात व्यक्ती लुटण्याच्या बहाण्याने तरुणाचे खिसे तपासात असताना तरुणाने त्यास विरोध केला. त्या व्यक्तीने तरुणाच्या डोक्यामध्ये जड लोखंडी वस्तूने मारले. त्याने तरुणाला दुखापत झाली. विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.