पुणे : भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला राजगड तालुक्यात नेऊन त्याला विजेच्या मनोऱ्यावरील तार कापून चोरी करण्यास प्रवृत्त केले. मात्र, मनोऱ्यावरुन तोल जाऊन तरुण कोसळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याऐवजी राजगड तालुक्यातील रांजणे गावात खड्डा खोदून पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बसवराज मंगळुरे (वय २२ सध्या रा. वडगाव बुद्रुक, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश अरुण येनपुरे (वय २५), सौरभ बापू रेणुसे (वय २५, दोघे रा. पाबे, ता. राजगड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बसवराज मित्र सौरभ रेणुसे याच्यासोबत १२ जुलै रोजी भात लावणीसाठी राजगड तालुक्यातील पाबे गावात गेला होता. १३ जुलै रोजी बसवराज आणि त्याचा मित्र सौरभ रेणुसे, रुपेश येनपुरे यांच्यासोबत रांजणे गावातील विजेच्या मनोऱ्यावर चढुन तार कापत चोरीचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तार तुटुन बसवराज काेसळला. गंभीर जखमी झालेल्या बसवराजला सौरभ आणि रुपेश यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. दोघांनी बसवराजला रुग्णालयात नेले नाही. त्याला पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन जिवंत गाडले. दरम्यान, बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत तिने रूपेश येनपुरे आणि सौरभ रेणूसे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत तिढा

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय यांनी रूपेशला ताब्यात घेतले. पोलिसांंचे पथक त्याला घेऊन पाबे गावात पोहोचले. वेल्हे पोलीस, तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत सौरभने पोलिसांना खड्डा दाखविला. बसवराजला खड्ड्यात पुरण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी संबंधित गुन्हा वेल्हे पोलिसांकडे सोपविला आहे. आरोपी सौरभ आणि त्याचा मित्र रुपेश यांना वेल्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, सतीश नागुल, सुहास गायकवाड,सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षीरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune youth buried after electrocuted two arrested by sinhagad road police pune print news rbk 25 css