पुणे : शेअर बाजरात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एरंडवणे भागातील एका तरुणाची ४४ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणााने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण एरंंडवणे भागात राहायला आहे. चोरट्यांनी ६ नोव्हेंबर रोजी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्याला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यावर तरुणाने वेळोवेळी पैसे जमा केले. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला परताव्यापोटी काही रक्कम दिली. त्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसंकडे तक्रार दिली.
कारवाईची भीती दाखवून फसवणूक
काळा पैसा व्यवहारात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या बँक खात्याचा वापर काळा पैसा व्यवहारात झाल्याची भीती चोरट्यांनी तरउणीला दाखविली. तरुमीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून चोरट्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकारी असल्याची बतावणी केली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्यांनी तरुणीला दाखविली. तरुणीला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. तरुणीची पाच लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत.