पुणे : मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना गोखलेनगर भागात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली.

दिलीप यल्लपा अलकुंटे (वय ४५, रा. जनता वसाहत, जनवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रामजी निलू राठोड (वय ५०), अनुसया रामजी राठोड (वय ४५), करण रामजी राठोड (वय १९) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अलकुंटे यांची वहिनी पुष्पा राजेश अलकुंटे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिलीप अलकुंटे एका गॅरेजमध्ये काम करतो. आरोपी रामजी राठोड बिगारी काम करताे. शनिवारी रात्री दिलीप याने रामजी याच्याकडे मुलीच्या लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा रामजीने लग्नास नकार दिला. ‘तुला काय समजते का ? तुझ्या आणि मुलीच्या वयात खूप अंतर आहे’, असे रामजीने त्याला सांगितले. रामजीने त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. रामजी, त्याची पत्नी अनुसया, मुलगा करण याने दिलीपला बेदम मारहाण केली.

मारहाणीत दिलीप गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान रविवारी सकाळी दिलीप याचा मृत्यू झाला. त्यानंतर या गु्न्ह्यात कलमवाढ करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामजी आणि अनुसया यांना अटक करण्यात आली आहे, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सांगितले. सहायक निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.

Story img Loader