पुणे : बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना गोळी सुटल्याने तरुण जखमी झाला. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एकास अटक केली. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना घडली. अभय छगन वाईकर (वय २२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय १९, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार आनंद घोलप यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.वाईकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभय वाईकर आणि अविष्कार धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत. वाईकरने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित होता. पिस्तूल हाताळताना धनवडे याच्याकडून पिस्तूलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

हेही वाचा : जरांगे यांना समजवण्यात आम्ही कमी पडतोय…

बिहारमधून पिस्तूल खरेदी

अभय वाईकरने बिहारमधून देशी बनावटीचे पिस्तूल आणले होते. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. वाईकरने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने कोणाकडून पिस्तूल खरेदी केले, याची माहिती घेण्यात येत आहे. पिस्तुल हाताळताना चाप ओढला गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune youth injured while handling contry made pistol in khadakwasla area pune print news rbk 25 css