पुणे : वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एका मुलावर हल्ला केल्याची घटना कोथरुड भागातील डहाणूकर कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री घडली. त्यावेळी टोळक्याच्या तावडीतून सुटलेल्या मुलाच्या मित्रावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि अलंकार पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.
श्रीनु शंकर विसलवात (वय २२, रा. लक्ष्मीनगर वसाहत, डहाणूकर कॉलनी, कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका मुलाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्रीनु आणि त्याचा मित्र शुक्रवारी रात्री डहाणूकर कॉलनी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन पाच ते सहाजण आले. त्यांनी मुलावर कोयत्याने वार केला. मुलाने कोयत्याचा वार चुकविला. त्यानंतर मुलगा तेथून पळाला. श्रीनु टोळक्याच्या तावडीत सापडला. टोळक्याने त्याचा पाठलाग करून कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या श्रीनुला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा…पिंपरी : आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा…पोलिसांनी सुरू केला अनोखा उपक्रम…
डहाणूकर कॉलनी परिसरात खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर घबराट उडाली. अलंकार पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. चव्हाण तपास करत आहेत.