पुणे : शहरात झिकाचे सहा रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. झिकाचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्याने महापालिकेने त्यांच्या तपासणीवर भर दिला आहे. एरंडवणे, मुंढवा आणि डहाणूकर कॉलनी परिसरात झिकाचे रुग्ण आढळून आले असून या परिसरातील ४१ गर्भवतींचे रक्त नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत.
झिका विषाणूचा धोका हा गर्भवती आणि तिच्या गर्भाला असतो. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका विषाणूचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील गर्भवतींची तपासणी सुरू केली आहे. एरंडवणे परिसरात एकूण ७२ गर्भवती असून, त्यातील १४ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर मुंढवा परिसरातील ६० पैकी १८ गर्भवतींचे नमुने आणि डहाणूकर कॉलनी परिसरातील ३५१ पैकी ९ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे पाठविले आहेत.
हेही वाचा…विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यात अनियमितता… कारण काय?
आरोग्य विभागाने गर्भवतींसह एकूण ६४ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविले. त्यातील सुमारे २५ जणांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले आहेत. त्यामुळे अद्याप सुमारे ४० जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. एनआयव्हीमध्ये संपूर्ण देशभरात रक्तनमुने तपासणीसाठी येतात. त्यामुळे तपासणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
हेही वाचा…राज्यातील निरक्षरांचे पुन्हा सर्वेक्षण… किती नोंदणी करण्याचे उद्दिष्ट?
६६ हजारांचा दंड वसूल
पावसाळा सुरू होताच कीटकजन्य आजारांचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. यामुळे महापालिकेने या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पावले उचलली आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. यात २४६ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. या प्रकरणी ८२ जणांना नोटीस बजावून, त्यांच्याकडून देऊन ६६ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे य़ांनी दिली.