पुणे : शहरात एरंडवणा आणि मुंढव्यात झिकाचे तीन रुग्ण आढळले होते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २० जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत. त्यात ५ गर्भवती आणि रुग्णांच्या कुटुंबीयांसह तापाची लक्षणे असणाऱ्या १५ जणांचा समावेश आहे. यामुळे झिकाचा धोका अद्याप कायम असल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एरंडवण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यात ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. एरंडवणा परिसरातील ५ गर्भवती आणि ३ संशयित रुग्णांचे नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने एनआयव्हीला पाठविले आहेत. याचबरोबर परिसरातील २ हजार ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ७९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

हेही वाचा : महायुतीमध्ये अजित पवार नकोत! शिरूरमधील आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीने वाद उघड

मुंढव्यात एका ४७ वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाला होता. खासगी प्रयोगशाळेतील तिचा तपासणी अहवाल झिका पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने तिचा रक्तनमुना तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविला होता. त्यानंतर आता रुग्णाच्या कुटुंबातील ३ सदस्य आणि शेजारील तापाची लक्षणे असणारे ९ जण अशा १२ जणांचे रक्तनमुनेही तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. याचबरोबर १ हजार ५० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ४९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या, असे डॉ. दिघे यांनी सांगितले.

खासगी प्रयोगशाळेकडून दिरंगाई

मुंढव्यातील झिका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती खासगी प्रयोगशाळेने महापालिकेला कळविली नव्हती. या रुग्णाचा तपासणी अहवाल १ जूनला मिळाला होता. प्रत्यक्षात याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला २२ जूनला मिळाली. या कालावधीत हा रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेऊन घरी गेला होता. या प्रकरणी खासगी प्रयोगशाळेला महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : दुधाला प्रति लिटर ४० रुपये दरासाठी शेतकरी संघटनांचे आजपासून आंदोलन

पावसाळा सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांनी अशा रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. याबाबत खासगी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांना पत्र पाठविण्यात आले आहे.

डॉ. कल्पना बळिवंत, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune zika virus blood samples of 20 people from erandwana mundhwa sent for testing pune print news stj 05 css