पुणे : देशभरात साखर पोहोचविण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली असून, भरघोस उत्पन्नाच्या माध्यमातून रेल्वेलाही गोड दिवस आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर सर्वाधिक उत्पन्न मालवाहतुकीतून मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने साखर, पेट्रोलियम पदार्थ, ऑटोमोबाइल आणि इतर सामग्रीच्या वाहतुकीचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाला मालवाहतुकीतून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ५०६.८० कोटींचे उद्दिष्ट दिले होते. रेल्वेने फेब्रुवारीअखेर ७५ कोटी (३.४ टक्के) अतिरिक्त महसूल प्राप्त करताना, ५२४.१४ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी सर्वाधिक ३०६.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
रेल्वेच्या माध्यमातून प्रामुख्याने मुंबईस्थित जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), मुंबई आणि गुजरातमधील कांडला बंदरापर्यंत साखर नेली जाते. ही साखर परदेशात जहाजाद्वारे पाठवली जाते. काही साखर उत्तर भारतातील राज्यांतही पाठवली जाते.
साखरेच्या वाहतुकीत दोन वर्षांत वाढ
रेल्वेच्या पुणे विभागाला आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केवळ साखर वाहतुकीतून २२० कोटी उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर २०२३-२४ मध्ये २३१.५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या वेळी ३३५ डब्यांद्वारे साखरेची वाहतूक करण्यात आली होती. चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वाधिक ४४२ डब्यांमधून वाहतूक करण्यात आली असून, ३०६.४१ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
मळीच्या वाहतुकीला चालना
साखर कारखान्यांमधून साखरेबरोबर मळीचे उत्पादनही केले जाते. मद्य तसेच औषधनिर्मितीसाठी मळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रेल्वेनेही प्रथमच मळीची वाहतूक सुरू केली आहे. रेल्वेने २४ डब्यांमधून मळीची सुरक्षित वाहतूक केली असून, १५.१५ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीतून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. सुरक्षित, नियमित आणि सुयोग्य पद्धतीने मालवाहतूक करण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच, रेल्वेची कार्यक्षमता दिवसेंदिवस वाढत असून, आणखी सुलभ सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.- राजेशकुमार वर्मा, व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग