नवी सांगवी येथील नदीपात्रात महापालिकेने बांधलेली सीमाभिंत पाडून त्याचे सपाटीकरण करून त्यावर अनधिकृत पत्राशेड उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासणी पथकाच्या पाहणीत उघड झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत येत्या १५ दिवसात पाडलेले बांधकाम पुन्हा करण्याचे व तेथील पत्राशेड काढून टाकण्याची शिफारस पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
पवना नदीच्या पात्रात अनधिकृतपणे पत्राशेड उभारण्यात आले आहे, अशी तक्रार मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदनाद्वारे केली. तेव्हा सहायक आयुक्त शहाजी पवार यांच्या पथकास आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पवार यांनी पाहणी केली व त्याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. पालिकेने नदीपात्रात बांधलेली सीमाभिंत १२ ते १५ फूट इतकी तोडण्यात आली होती. नदीपात्रात १५ फूट भराव टाकून त्याची उंची वाढवून त्याचे सपाटीकरण करण्यात आले होते. तयार झालेल्या त्या जागेवर ट्रक, जीप, मिनी बस उभी करण्यात येत होती. त्यासाठी अनधिकृतपणे पत्राशेड उभारण्यात आल्याचे पवार यांच्या पथकास आढळून आले होते. या संदर्भात, पाडलेली भिंत नव्याने बांधण्याची व पात्रातील भराव काढून टाकण्याची सूचना पवार यांनी स्थापत्य विभाग तसेच प्रभाग अधिकाऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे, सपाटीकरण केलेल्या जागेवर उभारण्यात आलेले पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई करण्याची शिफारसही कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा