पुणे : लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा न मिळाल्यानंतर महायुतीमधील धुसफूस सुरू असतानाच महायुतीमध्ये अजित पवार नकोत, अशी स्पष्ट भूमिका शिरूरचे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत घेतल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील खदखद बाहेर आली आहे. आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवामागील कारणांचे चिंतन करण्यासाठी भाजपची बैठक झाली. पराभवाच्या कारणांबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या व्यूहरचनेसंदर्भात चर्चा या बैठकीत झाली. बैठकीला माजी मंत्री सुभाष देशमुख, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : दुधाला प्रति लिटर ४० रुपये दरासाठी शेतकरी संघटनांचे आजपासून आंदोलन

शिरूरचे जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यांनी यावेळी अजित पवार महायुतीत नको, अशी भूमिका घेतली. ते म्हणाले की, अजित पवार पालकमंत्री आहेत. त्याचा त्रास भाजप कार्यकर्त्यांना सहन करावा लागत आहे. पवार यांनी सुभाष देशमुख, राहुल कुल यांच्यावरही अन्याय केला आहे. ते महायुतीमध्ये आले नसते तर, भाजप पदाधिकाऱ्यांची महामंडळात वर्णी लागली असती. कार्यकर्त्यांचे ऐकणार असाल तर, महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढा.

हेही वाचा : मोहोळ यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेताच २४ तासांत कार्यवाही! पुणेकरांच्या हवाई प्रवासातील अडथळा तातडीने दूर

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता. लोकसभा निवडणुकीतील चुका टाळत विधानसभेची तयारी करावी लागेल. शिरूर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवार द्यावा लागेल. विधानसभेला बाहेरून आलेल्यांना संधी देण्याऐवजी पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना संधी दिली जावी, अशी अपेक्षाही काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केली.