पिंपरी: शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविताच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यावर टीका करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे यांनीही आपली तयार असल्याचे सांगितले. लांडे यांच्या तुलनेत आढळरावांची ताकद अधिक असल्याने पवार गट त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरुरमध्ये २०१९ मध्ये ऐनवेळी डॉ. कोल्हे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यात आली. कोल्हे यांनी तीनवेळा निवडून आलेल्या आढळराव पाटील यांचा पराभव केला. गेल्या पाच वर्षांत आढळराव पाटील हे अजित पवारांवर सातत्याने टीका करत आले आहेत. पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादीतील फुटीनंतर डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

आता अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंचा पराभव करण्याचा निर्धार केला. मात्र, उमेदवार कोण हे सांगणे त्यांनी खुबीने टाळले. महायुतीमध्ये शिरुरची जागा अजित पवार यांच्या गटाला सुटणार आहे. त्यामुळेच भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे शांत झाल्याचे चित्र आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी खासदार आढळराव पाटील हे देखील अस्वस्थ आहेत. त्यांनी अजित पवार यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली असून अजित पवार यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती ते करून दाखवतात असे सांगत कोल्हेंचा पराभव करण्याच्या भूमिकेला साथ दिली.

हेही वाचा… ‘… तर कारवाई करा,’ दीपक केसरकर यांचे आदेश

सलग दोनवेळा भोसरीतून पराभव झालेले माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मागीलवेळी तयारी केली असताना ऐनवेळी डॉ. कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. २००९ मध्ये त्यांचा शिरुरमधून पराभव झाला होता. सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आजपर्यंत लोकसभा लढविण्याचे टाळले. आता प्रकृतीचे कारण असल्याने ते निवडणूक लढविण्याची शक्यता धूसर आहे. लांडे यांच्या तुलनेत सलग १५ वर्षे शिरुरचे प्रतिनिधित्व करणारे आढळराव यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. शिवसेनेला जागा सुटणार नसल्याने आढळराव हे पवार गटात येऊ शकतात. युतीमध्ये उमेदवार देवाण-घेवाण यापूर्वी झालेली आहे. आढळराव पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यामुळे मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आणि राजकीय पुनर्वसनासाठी ते अजित पवार गटात सहभागी होऊ शकतात. पवार गटाकडून निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिरुरच्या मैदानात पुन्हा डॉ. कोल्हे विरुद्ध आढळराव असा सामना होऊ शकतो.

शिरुरमध्ये अजित पवार गटाची ताकद

शिरुर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे, खेळ-आळंदीचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार गटात, तर शिरुरचे अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत असून जुन्नरचे अतुल बेनके यांनी अद्याप ठामपणे आपण कोणासोबत आहोत, हे सांगितले नाही. भोसरीचे महेश लांडगे भाजपचे आमदार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shirur for ncp candidate there is a chance of a dr amol kolhe vs shivajirao adhalarao patil as adhalarao patil might go in ajit pawar group pune print news ggy 03 dvr