शिरूर : कोंबड्यांच्या खुराड्यात अडकून बिबट्याची मादी शनिवारी पहाटे कैद झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी अडकली. बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली आणि सोनवणे यांनी खुराड्याचे दार बंद केल्याने बिबट्याची मादी कैद झाली.
घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या निमोणे, गुनाट आणि शिंदोडी भागात बागायती शेती असल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणात ऊसाचे पीक आहे. अनेकवेळा ऊसाच्या फडात बिबट्या लपून बसतो. भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होते.
शिंदोडी येथील शेतकरी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्याची मादी अडकली. त्यामुळे आरडाओरडा करत कोंबड्या खुराड्याच्या बाहेर पळाल्या. कोंबड्यांच्या आवाजाने जागे झालेल्या सोनवणे यांना बिबट्याची मादी खुराड्यात शिरलेली दिसली. प्रसंगावधान राखत त्यांनी खुराड्याचे दार बाहेरुन बंद केल्याने मादी खुराड्यात अडकून पडली.
हेही वाचा : शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर होणार काय?
वनविभागास कळविल्यानंतर जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे, त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे सर्वजण शिंदोडी येथे आले. खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीच इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले. बिबट्याची मादी अंदाजे दोन वर्षांची असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.