पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला झुकते माप मिळाल्याचे दिसून येत आहे. पुरंदर विमानतळ, मिसिंग लिंक, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, वर्तुळाकार मार्गासाठी चार हजार कोटी, मेट्रोचा विस्तारित मार्गासाठी तरतूद करतानाच ‘कसब्या’तील भिडे वाड्यासाठी पन्नास कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्याकडे विशेष लक्ष दिल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ठप्प झालेल्या पुण्याच्या विकासाला गती मिळेल, असा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात या वेळी पुण्यासाठी विविध गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी, पिंपरी-चिंचवड-स्वारेगट मेट्रो मार्गिकेचे स्वारगेटपासून कात्रजपर्यंत विस्तारीकरण, वर्तुळाकार मार्ग, डेक्कन काॅलेज आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठासाठी पाचशे कोटी, बालेवाडी येथे स्पोर्टस् सायन्स सेंटर, व्यसनमुक्ती केंद्र, पुरंदर विमानतळ, पुणे सर्क्युलर इकाॅनाॅमी पार्क, संत जगनाडे महाराज समाधी स्थळांसाठी पंचवीस कोटी, भीमाशंकर मंदिराच्या संवर्धनासाठी तरतूद, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय शिवनेरी येथे बिबट सफारीही अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राबविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमावेळी केली होती. या दरम्यान कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. भाजपचा बालेकिल्ला असतानाही कसब्यात भाजपला पराभूत व्हावे लागले. आता महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुण्याला झुकते माप दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, यातील बहुतांश योजना आणि प्रकल्पांना यापूर्वीच मंजुरी दिली असली तरी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याने पुण्याला झुकते माप मिळाले आहे. त्यातून पुणे शहर आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यामुळे जुन्या प्रकल्पांना भरीव तरतूद करण्यात आल्याचे दिसत आहे.