पुणे: पोटनिवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा, या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोटनिवडणूक असो किंवा सार्वत्रिक निवडणूक पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तो सोडण्याचा प्रश्नच नाही, असे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले आहे.पुणे लोकसभेची पोटनिवडणूक तातडीने घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, लोकसभेची मुदत अवघ्या काही महिन्यात संपुष्टात येणार असल्याने पोटनिवडणूक होईल, याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र पोटनिवडणूक होईल, या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे लोकसभेवर दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिला आहे. गेली निवडणूकही काँग्रेसनेच लढविली होती. मात्र खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर काही दिवसांतच पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. आघाडीत ज्याची जास्त ताकद तो मतदारसंघ त्या पक्षाचा असेल, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी घेतली होती. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे जाहीर फलकही उभारण्यात आले होते. मात्र पोटनिवडणूक होणार नाही, हे लक्षात येताच मतदारसंघ कोणाचा हा मुद्दाही मागे पडला.

हेही वाचा… पाणीकपात टाळण्यासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय; दररोज होणार २०० दशलक्ष लीटर पाण्याची बचत

मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे.राज्यातील सत्ता समीकरण गेल्या काही महिन्यांत बदलली. राष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पडली. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाले. त्यामुळे अजित पवार गट पुण्याची पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता कमीच आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे यांची महाविकास आघाडी कायम आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीनंतर काँग्रेसकडून आकडेवारीसह या जागेवर यापूर्वीच दावा करण्यात आला आहे.

पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अनंत गाडगीळ; तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला बालेकिल्ल्यातच पराभूत करणारे आमदार रवींद्र धंगेकर यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवार कोण असेल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र त्यापूर्वी मतदार संघ कोणाचा याबाबत दावे प्रतिदावे होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नैसर्गिक मित्रपक्ष आहे. राज्यातील जागांची अदलाबदल होणार आहे. पोटनिवडणूक असो किंवा सार्वत्रिक निवडणूक पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कायमच आग्रही आहे.– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

इच्छा व्यक्त करणे गैर नाही. मात्र वातावरण बिघडणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यापुढेही अनेक निवडणुका होणार आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. – अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the by elections possibility that congress and ncp will face each other on the issue of who owns the pune lok sabha constituency pune print news apk 13 dvr