शहरात पादचारी नागरिकांकडील ऐवज तसेच मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून फर्ग्युसन रस्ता, बोट क्लब रस्त्यावर चोरट्यांनी महिलांकडील दोन लाखांचा ऐवज हिसकावून नेल्याची घटना घडली. कल्याणीनगर परिसरात एका पादचाऱ्याचा मोबाइल संच हिसकावून नेण्यात आला.

हेही वाचा – पुणे : सात वर्षानंतर शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना उघड

याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला घोले रस्ता परिसरात राहायला आहेत. त्या फर्ग्युसन रस्त्यावरुन जात होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मु्ख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच हेडफोन असा एक लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.

बोट क्लब रस्ता परिसरात रिक्षा प्रवासी महिलेची पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि तिचे पती रिक्षातून घरी जात होते. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी रिक्षा प्रवासी महिलेची पिशवी हिसकावून नेली. पिशवीत मोबाइल संच, घड्याळ असा २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल होता. सहायक पोलीस निरीक्षक लिगाडे तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : आपल्याकडे चित्रकला आजही दुर्लक्षितच ; चंद्रमोहन कुलकर्णी यांची खंत

दरम्यान, येरवड्यातील कल्याणीनगर भागात पादचाऱ्याचा ३८ हजार रुपयांचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत पादचाऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.