पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने १७ मार्चपासून महिला सन्मान योजना कार्यान्वित केली. या योजनेत पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट अखेरपर्यंत एसटीच्या पुणे विभागात एकूण १ कोटी २१ लाख महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
एसटीच्या पुणे विभागात मार्च महिन्यात ७ लाख ८३ हजार ५४४ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यावेळी एसटीला २ कोटी ९२ लाख ७७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि महिलांना तेवढ्याच रकमेची तिकिटात सवलत मिळाली. एप्रिल महिन्यात महिला प्रवाशांची संख्या वाढून २० लाख ३० हजार ४४९ झाली आणि त्यातून ८ कोटी २ लाख ७६ हजारांचे उत्पन्न मिळाले. मे महिना हा सुटीचा हंगाम असल्याने त्यात सर्वाधिक महिला प्रवासी संख्या नोंदविण्यात आली. मेमध्ये २७ लाख ७७ हजार ४८९ महिलांनी प्रवास केला आणि त्यातून १० कोटी ८३ लाख २२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आणखी वाचा-पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीची तयारी जोरात
जूनमध्ये महिला प्रवाशांची संख्या २१ लाख १८ हजार ६४५ होती तर त्यातून मिळालेले उत्पन्न ८ कोटी ९१ लाख ४८ हजार रुपये होते. जुलैमध्ये २१ लाख १८ हजार ६४५ महिलांनी प्रवास केला आणि त्यातून ७ कोटी ५९ लाख ९८ हजारांचे उत्पन्न मिळाले. ऑगस्ट महिन्यात महिला प्रवाशांची संख्या २१ लाख ८७ हजार ५२५ असून, त्यातून एसटीला ८ कोटी ५६ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
महिला सन्मान योजना (१७ मार्च ते ३१ ऑगस्ट)
- एकूण महिला प्रवासी : १ कोटी २१ लाख ६ हजार ७५२
- प्रत्यक्ष प्रवासभाडे : ९३ कोटी ७३ लाख १० हजार रुपये
- वसूल प्रवासभाडे : ४६ कोटी ८६ लाख ५५ हजार रुपये
सन्मान योजनेत महिलांना ५० टक्के सवलत असल्याने त्यांच्या संख्येत वाढ झाली. मे महिन्यात सुटीच्या काळात महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक वाढली होती. आगामी सणासुदीच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे. -सचिन शिंदे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी