पुणे : ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पुणे विभागीय अंतिम फेरीत मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाची (एमएमसीसी) ‘सिनेमा’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. ही एकांकिका आता ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. मुकुंदनगर येथील सकळ ललित कलाघर येथे रविवारी पार पडलेल्या विभागीय अंतिम फेरीत मॉडर्न महाविद्यालय गणेशिखडच्या ‘फेलसेफ’ एकांकिकेने सांघिक द्वितीय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या ‘रवायत-ए-विरासत’ या एकांकिकेने सांघिक तृतीय पारितोषिक मिळवले.

पुणे विभागीय अंतिम फेरीत शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाची ‘रवायत-ए-विरासत’, आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाची ‘बी अ मॅन’, मॉडर्न महाविद्यालय, गणेशिखडची ‘फेलसेफ’, सिम्बायोसिस महाविद्यालयाची ‘काव्याची आकांक्षा’, मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालयाची ‘सिनेमा’ या एकांकिकांचे सादरीकरण झाले. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाचही संघांनी कसून तयारी केली होती. त्यामुळे अपूर्व उत्साहात रंगकर्मीनी सादरीकरण केले. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, प्रोत्साहन देणारी घोषणाबाजी आणि टाळय़ांच्या वातावरणात अंतिम फेरी पार पडली. लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण केले आणि ‘सिनेमा’ला पुणे विभागीय फेरीचे विजेते म्हणून जाहीर केले.

हेही वाचा >>>पुणे विमानतळाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता चेंडू सरकारच्या कोर्टात

अंतिम फेरीमध्ये अतिशय छान एकांकिका सादर झाल्या. विद्यार्थ्यांनी एकांकिका या माध्यमाचा बारकाईने विचार करून, अभ्यास करून सादरीकरण केले पाहिजे.- शुभांगी दामले, परीक्षक

अंतिम फेरीत विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले. विषयांमध्ये वैविध्य होते. विद्यार्थ्यांनी रंगावकाशाच्या वापराचा विचार केला पाहिजे, लेखनाकडे लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त एकांकिका पाहणे, वाचन वाढवण्याची आवश्यकता आहे.-वरुण नार्वेकर, परीक्षक

(‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागीय अंतिम फेरीत मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या (एमएमसीसी) ‘सिनेमा’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि भारती विद्यापीठाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी (डावीकडे) परीक्षक शुभांगी दामले, वरूण नार्वेकर उपस्थित होते.)