पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर करताना भारतीय जनता पक्षाने पुणे मतदारसंघ वगळता तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबादारी अन्य पक्षांतून भाजपमध्ये आलेल्यांना दिली आहे. शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची भिस्त ही ‘आयारामां’वर असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी केवळ पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपाचे पहिल्यापासूनचे पदाधिकारी आहेत.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची – जिलब्या मारुतीच्या नावामागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे?

शिरूर लोकसभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रसमधून भाजपामध्ये आलेले आमदार महेश लांडगे यांच्याकडे, तर मावळची जबाबदारी मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले प्रशांत ठाकूर यांना देण्यात आली आहे. यापूर्वी काँग्रेसचे असलेेले आणि काही काळ राष्टीय समाज पक्षात राहिलेले राहुल कुल यांना बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वापरून आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांत, पुण्यात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातही हाच प्रकार असून काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर, प्रदीप कंद यांना शिरूर, आशा बुचके यांना आंबेगाव, बाबाराजे जाधवराव यांना पुरंदर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the upcoming pune lok sabha elections bjp focus is on leaders from other party in bjp pune print news apk 13 ssb
Show comments