पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या निर्यातबंदीविरोधात राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कांद्यासह अन्य शेतीमालावरील निर्यातबंदी न उठविल्यास पंतप्रधानांच्या दौऱ्यात विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंत निदर्शने करण्यात येतील, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वतंत्र भारत पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार आणि महाराष्ट्र राज्य कांदाउत्पादक संघटना यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातीवरील बंदी उठविली नाही, तर शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध करावा, असे आवाहन या संघटनांनी केले आहे. शेतकऱ्यांनी विरोध न केल्यास केंद्राच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा पािठबा असल्याचा समज होईल, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट यांनी व्यक्त केले. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून निषेध नोंदविण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा >>>जागतिक शहरांच्या धर्तीवर अयोध्येचा विकास!

नुकसान भरून द्या

सात डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लादल्यापासून शेतकऱ्यांचे १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचे नुकसान होत आहे. हा एकूण आकडा १५०० कोटींवर गेला आहे. हे नुकसान केंद्र सरकारने भरून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदाउत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली.

स्थानबद्धतेची शक्यता 

पंतप्रधान नाशिक येतात, तेव्हा दौऱ्याच्या एक दिवस आधी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांना स्थानबद्ध केले जाते. त्यामुळे नेते नसतील, तरी सर्वसामान्य कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी निदर्शने करावीत, असे आवाहन या नेत्यांनी केले आहे. तर पोलीस प्रशासनाने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घालून देण्याची मागणी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the wake of prime minister narendra modi visit to nashik farmers organizations in the state have warned against the ban on onion exports amy