पुणे : हरियाणातील विजयामुळे भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही ‘हरियाणा पॅटर्न’ वापरण्याच्या हालाचाली भाजपकडून सुरू झाल्या असून, जातीय समीकरणांचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे समजते. तसेच सलग तीन वेळा आमदार झालेल्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही केले जाणार असल्याने अशा आमदारांची धाकधूक आता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपला फटका बसेल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या हरियाणातील निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. या निवडणुकीत सामाजिक आणि जातीय समीकरणे जुळविण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यातही चमत्कार घडविण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे. मूल्यमापनानंतरच निवडणुकीत पुन्हा संधी देण्याचा किंवा न देण्याचा निर्णय होणार असल्याने तीन वेळा आमदार झालेल्या आणि पुन्हा उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्यांची धाकधूक वाढली आहे.

शहराचा विचार करता, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर हे दोघे तीन वेळा आमदार झाले असून, चौथ्यांदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण, हरियाणा पॅटर्नच्या निकषामुळे पर्वती आणि खडकवासला मतदारसंघातील येथील इच्छुकांनी जोर पकडला आहे. हरियाणा पॅटर्ननुसार, निवडणूक जिंकण्याची शक्यता ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आमदारांची उमेदवारी ठरविण्याचे काम पक्षाची यंत्रणा करणार आहे. त्यासाठी बूथनिहाय नियोजन केले जाणार आहे.

हे ही वाचा…मतदान आळसाची पुणेकरांची सवय जुनीच!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना तिकिटे नाकारण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारांऐवजी नव्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माधुरी मिसाळ सलग १५ वर्षे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना स्वपक्षातून आव्हान निर्माण झाले असून, माजी सभागृहनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू श्रीनाथ भिमाले यांनी मिसाळ यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. भिमाले यांनी ‘लढणार आणि जिंकणार’ असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, आमदार मिसाळ यांनी काही दिवसांपूर्वी मतदारसंघातील विविध विकासकामांची माहिती जाहीर करून पर्वतीमधूनच चौथ्यांदा उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

हे ही वाचा…बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात असमर्थता

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीरही सलग तीन वेळा निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत तापकीर यांचा अवघ्या काही मतांनी निसटता विजय झाला होता. तापकीर यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहे. भाजपच्या बैठकीतही त्यावरून खडाजंगी झाली होती. तसेच या मतदारसंघावर शिवसेनेने (शिंदे) दावा केला आहे. मात्र, हा मतदारसंघ भाजपकडे राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे आमदारांच्या गेल्या १५ वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल. त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In upcoming assembly elections bjp plans to use haryana pattern for caste equations pune print newsm apk 13 sud 02