पुणे : यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणे तुडुंब भरलेली असतानाही पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल एक लाख ६७ हजार नागरिक अद्यापही तहानलेलेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नागरिकांना ६९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही तालुक्यांमध्ये सुरू झालेले टँकर अद्याप सुरू असल्याचे समोर येत आहे.
सर्वार्थाने सधन अशी ओळख असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळांमुळे अनेक ठिकाणी पिके वाळली होती. सिंचनाची सोय असलेल्या भागातही पाण्याअभावी पिकांनी मान टाकली होती. परिणामी चारा उपलब्धतेवरदेखील परिणाम झाला होता. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसली होती. विहिरींनी तळ गाठल्याने पाऊस कमी झालेल्या तालुक्यांत जनावरांच्या चाऱ्या-पाण्याची टंचाई जाणवत होती.
हेही वाचा : अल्पवयीनांच्या ‘उद्योगां’ची उद्योगनगरीला डोकेदुखी
मात्र, यंदा मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांत ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. भीमा खोऱ्यातील धरणे सुमारे ७० टक्के भरली आहेत. सर्वदूर पाऊस झाल्याने पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची चिंता मिटली असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही पुणे जिल्ह्यातील एक गाव, साताऱ्यातील दहा गावे, सांगलीतील ३६ आणि सोलापूर जिल्ह्यातील सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण ६९ टँकरपैकी २३ शासकीय, तर ४६ खासगी टँकरचा समावेश आहे. सर्वाधिक झळ सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत बसत आहे.
हेही वाचा : पिंपरीतील तीन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल
या पाणीटंचाईतून जनावरे देखील सुटलेली नाहीत. पुणे जिल्ह्यात २३२, सांगली २७ हजार ४२९, सोलापूर ५३९० असे एकूण ३३ हजार ५१ पशुधन बाधित असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
५३ गावांना टँकरने पाणीपुरवठा
जिल्हा – टँकर संख्या
पुणे – १
सातारा – १०
सांगली – ४३
सोलापूर – १५