पुणे: शांतता काळ असो की युद्धाचा, सैन्यदलांच्या कार्यक्षमता विस्तारण्यास हातभार लावणाऱ्या ‘इंटेलिजन्स कोअर’च्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन लष्कराच्या दक्षिण कमांडतर्फे करण्यात आले होते. ‘सदा सतर्क’ या ब्रीदवाक्याला जागत विभागातर्फे बजावण्यात येत असलेल्या सेवेबाबत लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘एकता दौड’चे आयोजन
गेल्या काही वर्षांमध्ये ‘इंटेलिजन्स कोअर’ ही भारतीय सैन्यदलांतील एक महत्त्वाची शाखा म्हणून विकसित झाली आहे. संरक्षण दलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अचूक आणि वेळेवर माहितीचे आदान-प्रदान करण्यात या विभागाचा हातखंडा आहे. या कामी उच्च व्यावसायिक मूल्य जपण्याबरोबरच क्षणोक्षणी समोर उभ्या असणाऱ्या आव्हानांचा सामना करणे, हे या विभागाचे वैशिष्ट्य आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने यांचा सक्षमपणे मुकाबला करत लष्करी मोहिमांना उपयुक्त सहाय्य करणे ही या विभागाची प्रमुख जबाबदारी समजली जाते.