सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ पंढरपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटनही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ध्यानात घेता आताच उद्घाटकाच्या नावाची घोषणा करू नये, असा निर्णय नाटय़ परिषदेने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच साहित्य आणि नाटय़ या दोन्ही संमेलनांचे उद्घाटक शरद पवार हेच असण्याचा योगायोग साधला जाणार आहे.
शरद पवार यांच्या हस्ते यापूर्वी औरंगाबाद आणि नाशिक येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले होते. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भास्कर जाधव हे राष्ट्रवादीचे मंत्रीच असल्यामुळे या संमेलनाचे उद्घाटन पवार यांच्याच हस्ते झाले होते. सासवड येथील साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून येण्यासंदर्भात संयोजन समितीने केलेली विनंती शरद पवार यांनी मान्य केली असल्याचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले. पवार यांच्या कार्यक्षेत्रातच सासवड येत असल्याने आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान या संमेलनाच्या आयोजक संस्थेचे ते स्थापनेपासून २३ वर्षे अध्यक्ष असल्याने त्यांनी संयोजकांची विनंती मान्य केली आहे.
गेल्या वर्षी, पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ ही शतकातून एकदाच येणारी अनोखी तारीख असा दुहेरी योग साधून बारामती येथे नाटय़संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आता पंढरपूर येथे होत असलेले नाटय़संमेलन हा पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या विश्वस्त मंडळाचेही ते अध्यक्ष आहेत. या दोन्ही कारणांसाठी संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनाच निमंत्रित करावे यावर नाटय़ परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही बाब ध्यानात घेऊनच त्यांचे नाव जाहीर करू नये, असाही निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Story img Loader