पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी संमेलनात चांगलेच फटकारले, तर अध्यक्षीय भाषण सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मंगेश पाडगावकर सभामंडप सोडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्यावर डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेली टीका रुचलेली नाही हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीतून शनिवारी दाखवून दिले. सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण सुरू होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभामंडप सोडला. संमेलन हे साहित्यातील वादासाठी असावे. इतर वादांपासून ते दूर असले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना फडणवीस यांचा रोख हा सबनीस यांनी केलेल्या टीकेकडेच होता. बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ. नकारात्मकता हा प्रसिद्धीचा सोपा उपाय अवलंबला जात असल्याचे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांचे भाषण झाल्यानंतर सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणापूर्वी फडणवीस यांनी सभामंडप सोडला आणि पुढील कार्यक्रमासाठी ते निघून गेले. मात्र, माऊंट अबू येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता विमान असल्याने मुख्यमंत्री माझी परवानगी घेऊन गेले, असा खुलासा सबनीस यांनीच केला.
संमेलन अध्यक्षपदाची झूल पांघरल्यानंतर काही बंधने येतात. आक्रमक स्वभावाला मुरड घालावी लागते आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आपणहून संकोच करून घ्यायचा असतो, असा सल्ला डॉ. सदानंद मोरे यांनी सबनीस यांना दिला. ही झूल पांघरून वावरण्यात मी बहुतांशी यशस्वी झालो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवड झाली, तर नंतरचे वादविवाद आणि रकाने छापून येण्याचे थांबेल, असे शरद पवार यांनी सांगितले. काही लोक वादामध्ये निष्कारण मला गोवतात. सबनीस यांची निवड झाल्यानंतर त्यांची आणि माझी भेट झाली होती असा खुलासाही पवार यांनी केला.
स्वागताध्यक्षांचाच गवगवा
साहित्यसंमेलन म्हटले की संमेलनाचे अध्यक्ष हे केंद्रबिदू. मात्र, पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणारे श्रीपाल सबनीस, त्यानंतर झालेले आंदोलन, दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकलेला पडदा या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड येथील साहित्यसंमेलनाचा केंद्रबिंदू अध्यक्षाकडून सरकून स्वागताध्यक्षाकडे आला आहे. संमेलनामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणारे युवक-युवती यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील हेच असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मावळते आणि नूतन अध्यक्ष व्यासपीठावर असतानाही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सत्कार हा स्वागताध्यक्षांच्याच हस्ते झाला. सत्यव्रत शास्त्री, प्रतिभा राय, रहमान राही आणि सीताकांत महापात्रा यांचा सत्कार डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती ध्यानात घेऊन नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनला एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. डॉ. पी. डी. पाटील आणि भाग्यश्री पाटील यांनी हा धनादेश सुपूर्द केला. हा निधी पाटील यांनी वैयक्तिक देणगी म्हणून दिला असल्याचे माधवी वैद्य यांनी जाहीर केले असले तरी धनादेशावर स्वागत समिती अध्यक्ष म्हणून डॉ. पी. डी. पाटील यांनी स्वाक्षरी केली आहे.
साहित्य रसिकांचे स्वागत करताना कोणतीही कसूर होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे. तरी काही उणिवा जरूर राहिल्या आहेत. त्याकडे कानाडोळा करून मराठी साहित्याचा उत्सव यशस्वी करावा, अशी भावना पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका नाहीच
साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाची पुस्तिका संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम संपेपर्यंत मिळालीच नाही. एवढेच नव्हे, तर शनिवारी संमेलनातील सर्व कार्यक्रम संपेपर्यंत साहित्य रसिकांना ही प्रत केव्हा उपलब्ध होईल हे कुणालाच नेमकेपणाने सांगता आले नाही.
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उत्स्फूर्त भाषण केले, मात्र साहित्य महामंडळाच्या परंपरेनुसार उपस्थित साहित्य रसिकांना अध्यक्षीय भाषणाची प्रत दिली जाते. या परंपरेमध्ये यंदा खंड पडला. सबनीस यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अध्यक्षीय भाषण ई-मेलद्वारे पाठविण्यात आले. मात्र, साहित्य महामंडळाकडे हे भाषण शुक्रवारी (१५ जानेवारी) सकाळी साडेअकराला पोहोचले. महामंडळ पदाधिकारी हे भाषण वाचून छपाई करण्यासाठी देतात. एवढय़ा कमी वेळात हे भाषण छापून त्याची पुस्तिका करणे शक्य झाले नाही. महामंडळाच्या रात्री झालेल्या बठकीमध्ये हे अध्यक्षीय भाषण छपाईला देण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीचा दिवस करून प्रकाशकांनी या भाषणाची प्रत केली खरी, पण त्याच्या पुस्तिकेची छपाई करण्याएवढा अवधी हातामध्ये नसल्याने ते ई-मेलद्वारे प्रसारमाध्यमांकडे पाठविण्यात आले. अध्यक्षीय भाषणातील विचार साहित्य रसिकांना वाचण्याचे भाग्य काही शनिवारी लाभले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा