पुणे : ‘परिसंवादाला महत्त्व देणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भविष्यामध्ये पुस्तककेंद्री आणि लेखककेंद्री व्हावीत,’ अशी अपेक्षा साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांनी मंगळवारी व्यक्त केली. ‘साहित्य संमेलन अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून, त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन राजेंद्र बनहट्टी, डाॅ. सदानंद मोरे, डाॅ. अरुणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते झाले. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

बनहट्टी म्हणाले, ‘महामंडळाचे कार्यालय १९८८ ते १९९२ या काळात पुण्यामध्ये होते तेव्हा मी अध्यक्ष होतो. मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी शंभर उत्कृष्ट पुस्तके अवघ्या एक हजार रुपयांत द्यायची ‘अक्षर वाङ्मय योजना’ आणण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, महामंडळ कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर ती योजना धूळ खात पडली. आता महामंडळाने अशीच एक नवी योजना आणून वाचकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा.’

मोरे म्हणाले, ‘साहित्य संमेलनाच्या रूपाने साहित्याचा उत्सव जरूर व्हावा. परंतु, काही ठोससुद्धा व्हावे अशी अपेक्षा आहे. सध्याच्या काळामध्ये भाषेवर आक्रमण करणारे एक नवे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या रूपाने आलेले आहे. हे तंत्रज्ञान जगण्याला व्यापून टाकणार असल्याने सगळ्याच भाषांना त्याचा सामना करावा लागणार आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.’

देशमुख म्हणाले, ‘साहित्य संमेलने लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. इंग्रजी लिटरेचर फेस्टिव्हलला युवकांचा इतका प्रतिसाद का असतो, याचा अभ्यास आपणही करून त्यानुसार संमेलनात बदल करणे गरजेचे आहे. परिसंवादकेंद्रित संमेलनाकडून ती पुस्तककेंद्रित आणि लेखककेंद्रित होणे गरजेचे आहे. वाचकांचा विचार करून उपक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीला नवे वळण कसे देता येईल हे पाहायला हवे.’

सासणे म्हणाले, ‘नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या नामांकित व्यक्ती, लेखक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. त्यातून वैश्विक विचार आपल्याला समजतील. बालसाहित्य हा विषय दुर्लक्षित राहत असल्याने संमेलनात त्याला महत्त्वाचे स्थान द्यायला हवे.’

साहित्य विश्वाचे ‘ब्रँड ॲम्बेसिडर’ असलेल्या माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. साचा मोडल्याशिवाय नवे काही करता येणार नाही. हे एकदम होणार नसले, तरी किमान दारे, खिडक्या किलकिल्या करण्याचे काम पुढील तीन वर्षांत नक्की केले जाईल. साहित्य संमेलनामध्ये दिसणारे तेच तेच चेहरे टाळून नवे चेहरे आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. परिसंवादांचे स्वरूप बदलून त्यांना चर्चासत्रांचे स्वरूप दिले जाईल. बालसाहित्यालाही संमेलनात स्थान दिले जाईल. संमेलन वाचककेंद्री व्हावे, असा प्रयत्न करून ग्रंथप्रदर्शनांतील तक्रारीही दूर केल्या जातील. संवादाचे पूल जोडण्याचे काम नक्की केले जाईल.- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ