गुरुवारी एकाच दिवसात पुण्यात डेंग्यूचे ४५ संशयित रुग्ण सापडले आहेत. या आठवडय़ात पहिल्या तीन दिवसांत मिळून शहरात ४३ संशयित डेंग्यूरुग्णांची नोंद झाली होती, पण गुरुवारच्या एकाच दिवसात ४५ डेंग्यूरुग्ण सापडल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात ६०४ संशयित डेंग्यूरुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक डेंग्यूरुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले आहेत. जुलैपासून शहरातील संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या वाढू लागली. जुलैत ७५ तर ऑगस्टमध्ये १५६ संशयित डेंग्यूरुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये ही संख्या २९० झाली.
ताप येणे, बारीक थंडी भरून येणे, प्रचंड अंगदुखी, हाडे प्रचंड दुखणे ही डेंग्यूची वेगळी ओळखता येतील अशी लक्षणे असून ताप आल्यावर रुग्णाच्या रक्तातील ‘प्लेटलेट काऊंट’ कमी-कमी होऊ लागतो. या प्लेटलेट २० हजार किंवा त्याहून कमी झाल्यास ते धोकादायक ठरु शकते, तसेच १० हजारांहून प्लेटलेट काऊंट कमी झाल्यास बाहेरून प्लेटलेट द्याव्या लागू शकतात. सध्या दिसणाऱ्या डेंग्यूच्या साथीत मात्र रुग्णांमध्ये १० हजापर्यंत प्लेटलेट काऊंट खाली जाणे जवळपास दिसत नसल्याचे निरीक्षण फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे यांनी नोंदवले. ते म्हणाले, ‘सध्याची डेंग्यूची साथ खूप गंभीर स्वरूपाची दिसत नाही, परंतु आपल्याला डेंग्यू झाल्याचे समजताच रुग्ण घाबरून जाऊन रुग्णालयात दाखल होण्याचा आग्रह धरतात. स्वाईन फ्लूमध्ये इतर आजार असलेल्या रुग्णांची प्रकृती स्वाईन फ्लूमध्ये लगेच गंभीर होण्याची शक्यता असते, पण डेंग्यूत असे नसते. अर्थात ज्या रुग्णास मधुमेह किंवा कर्करोग असे इतर आजार असतात त्याला कोणत्याही इतर आजारात त्रास होऊ शकतो.’
स्वाईन फ्लूमुळेही शहरात बुधवारी एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या स्वाईन फ्लूचे ३२ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल असून त्यातील १३ जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. आणखी २ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे पुण्यात १२९ मृत्यू झाले असून यातील ४५ रुग्ण पुण्यातील होते, तर ८४ पुण्याबाहेरून उपचारांसाठी शहरात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा