लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोथरूड भागातील संगणक अभियंता तरुणाला गुंड गजा मारणे टोळीतील सराईतांनी मारहाण करण्याच्या प्रकरणााला वेगळेच वळण लागले आहे. ‘मारहाण प्रकरणात कोणी चिथावणी दिली नाही’, असे प्रतिज्ञापत्र संगणक अभियंत्याने सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले.
संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना १९ फेब्रुवारी रोजी कोथरूड भागातील भेलकेनगर चौकात मारणे टोळीतील गुंडांनी किरकोळ वादातून मारहाण केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुंड गजा मारणे मारहाण करताना मोटारीत होता. त्याने साथीदारांना चिथावणी दिल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने मारणे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच मारणेचा भाचा श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपेश मारणे, श्रीकांत पवार हे पसार झाले. त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. मारणे, धर्मजिज्ञासू, पडवळ, तापकीर यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
प्रतिज्ञापत्रात काय म्हटले ?
‘ही घटना तात्कालिक असून, गैरसमजुतीतून घडली आहे. आरोपींव्यतिरिक्त घटनास्थळी अन्य कोणी हजर नव्हते. आरोपींनी मला कोणाच्या सांगण्यावरून मारहाण केली नाही. दबाव, दहशतीला बळी न पडता, हे प्रतिज्ञापत्र सादर करीत आहे,’ असे फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापज्ञात नमूद केले आहे.
मारणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
मारणेसह चौघा साथीदारांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. पसार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे आणि सरकारी वकील विलास पटारे यांनी केली. मारणे घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवादात सांगितले. मारणे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपी धर्मजिज्ञासू, तापकीर आणि पडवळ यांच्या पोलीस कोठडीत सहा मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्याायालयाने दिले.