पुणे : लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नाल्यामध्ये सोडले जात आहे. हे सांडपाणी नाल्यातून पुढे दोन नद्यांमध्ये मिसळून जलप्रदूषण होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नगर परिषदेला नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
लोणावळा नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू नसल्याची बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आली. त्यामुळे मंडळाने लोणावळा नगर परिषदेला नोटीस बजावली आहे. नोटिशीत म्हटले आहे की, नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित नाही. यामुळे सांडपाणी प्रक्रिया न करता नाल्यास सोडले जात आहे. हे सांडपाणी नाल्यातून पुढे इंद्रायणी नदीत मिसळून जलप्रदूषण होत आहे.
हेही वाचा >>>‘प्यूमा ब्रँड’चे बनावट साहित्य विकणाऱ्या दुकानावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त
नगर परिषदेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी स्वतंत्र वीजजोडणी घेतली नसल्याची बाबही उघडकीस आली आहे. नगर परिषदेकडून वेगवेगळ्या नाल्यांतून सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हे सांडपाणी पुढे इंद्रायणी आणि उल्हास नद्यांमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे, असे नोटिशीत नमूद केले आहे. या प्रकरणी नगरपरिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणाही मंडळाने केली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असून, याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर परिषदेला दंडात्मक कारवाईला सामोरे लागू शकते, असा इशाराही मंडळाने दिला आहे.
लोणावळा नगर परिषदेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीत सोडले जात असल्याने जलप्रदूषण होत आहे. या प्रकरणी नगर परिषदेला नोटीस बजाविण्यात आली असून, उत्तर देण्यास १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नगर परिषदेने १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा मंडळाकडे सादर करावा. या नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलण्यात येईल.- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ