पुणे : सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दागिन्यांची लूट केल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर एका सराफी पेढीत रविवारी रात्री घडली.घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर अरिहंत ज्वेलर्स सराफी पेढी आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन तीन चोरटे सराफी पेढीत शिरले. सराफी पेढीच्या मालकाला पिस्तुलाचा धाक दाखविला. अचानक शिरलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याने सराफी पेढीचे मालक घाबरले. चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे फवारला. त्यानंतर कोयत्याचा दांड्याने मारहाण करुन सराफी पेढीतील दागिने लुटून चोरटे दुचाकीवरुन भरधाव वेगात पसार झाले.
सराफी पेढीच्या मालकाने या घटनेची माहिती वानवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी त्वरीत नाकाबंदी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सराफी पेढीवर दरोडा टाकल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. पोलिसांनी बी. टी. कवडे रस्ता भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. सराफी पेढीतून नेमका किती ऐवज लुटण्यात आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली नाही. पोलिसांकडून सराफी पेढीच्या मालकांकडे चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा…मी पुणेकर असल्यावर शिक्कामोर्तब; मोठ्या मताधिक्याचे कारण, चंद्रकांत पाटील यांचे टीकेला उत्तर
बी. टी. कवडे रस्त्यावर लुटीची दुसरी घटना
वर्षभरापूर्वी बी. टी. कवडे रस्त्यावर एका सराफी पेढीच्या मालकावर पिस्तुलातून गोैळीबार करून दागिने लुटण्यात आल्याची घटना घडली होती. हडपसरमधील सय्यदनगर भागातील सराफी पेढी बंद करुन रात्री नऊच्या सुमारास सराफी पेढीचे मालक आाणि त्यांचा मुलगा दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवून दागिन्यांची लूट केली होती.