पुणे : जगभरातील दोन टक्के प्रतिभावान शास्त्रज्ञांची यादी स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सवेअर यांनी नुकतीच प्रसिद्ध केली. या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १५ संशोधकांचा समावेश आहे. विज्ञान क्षेत्रातील बावीस शाखांतील १७६ उपविषयांत काम करणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक शास्त्रज्ञांचा यादीत समावेश आहे. २०२१मधील माहिती संकलित करून यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. वर्षां गेज्जी- दफ्तरदार, डॉ. स्मिता झिंजर्डे, डॉ. सुमित दास, डॉ. राजेश गच्चे, डॉ. विश्वास काळे, डॉ. सुभाष पाध्ये, डॉ. बालाप्रसाद अलकमवार, डॉ. विकास मठे, डॉ. सुरेश जुंगारी, डॉ. हबीब पठाण, डॉ. अमन शर्मा, डॉ. अविनाश खरे, डॉ. श्रीधर गद्रे, डॉ. आर. सी. कांबळे आदींचा समावेश आहे.

कोणत्याही विद्यापीठात होणारे संशोधन हे त्या विद्यापीठाचा आत्मा असते. विद्यापीठात उच्च दर्जाचे संशोधक आणि प्राध्यापक असल्याने विद्यापीठाचे भविष्य उज्ज्वल आहे, असे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले. तर स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या यादीत विद्यापीठातील पंधरा संशोधकांनी स्थान मिळवल्याने विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा जागतिक असल्याचे सिद्ध होते. भविष्यात ही संख्या वाढत जाईल, असे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

Story img Loader