भोसरीचे आमदार विलास लांडे यांच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या नगरसेवक महेश लांडगे यांची स्थायी समितीत वर्णी लावण्यात आल्याने आगामी काळातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. जगदीश शेट्टी यांना अध्यक्ष करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनाथ जगताप यांना अध्यक्ष करण्याचा शब्द दिला. मात्र,  लांडगे यांच्या समावेशामुळे जगतापांना कडवी स्पर्धा होईल, असे स्पष्ट चित्र आहे.
महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत पालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार स्थायीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीच्या चार जागांसाठी लांडगे यांच्यासह माया बारणे, सुनीता वाघेरे, शकुंतला धराडे यांची, काँग्रेसच्या दोन जागांसाठी सद्गुरू कदम, गणेश लोंढे यांची, तर शिवसेनेच्या दोन जागांसाठी संगीता भोंडवे, आशा शेंडगे यांची वर्णी लागली. या नियुक्तीवरून सर्वच पक्षात वेगवान घडामोडी व नाराजीनाटय़ घडले. सर्वाधिक उलथापालथ राष्ट्रवादीत झाली. वाघेरे बनसोडे समर्थक आहेत तर धराडे व बारणे जगताप समर्थक आहेत. लांडगे यांची शिफारस गुलदस्त्यात आहे.
महेश लांडगे यांना आतापर्यंत कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही व त्यामागे आमदार लांडे यांचे गावखाती डावपेच असल्याची भावना लांडगे समर्थकांमध्ये आहे. लांडगे यांनी भोसरी विधानसभेचे तिकीट मागितले होते. मात्र नाटय़मय घडामोडीनंतर त्यांचा पत्ता कट झाला होता. तेव्हापासून दोहोंतील सुप्त सत्तासंघर्ष महापौरपदावरून वाढला होता. योगेश बहल यांचे महापौरपदाचे वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना पायउतार करण्याची पूर्ण तयारी पक्षात झाली होती. महापौर होण्याची लांडगे यांची संधी ‘म्हणजे काय’ या एकाच शब्दाने हुकली होती. पुढे, मोहिनी लांडे महापौर झाल्या व आपल्याला सातत्याने डावलण्यात येत असल्याने संतापलेल्या लांडगे यांनी आमदारांच्या विरोधात लढण्याची तयारी करत ‘पोस्टरबाजी’ तून आपले मनसुबेही स्पष्ट केले. महेश लांडगे यांना स्थायी समितीत संधी देऊन अजितदादांनी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. लांडगेंना दोन वर्षांपैकी एकावेळी अध्यक्षपद देण्याची योजना असावी, महापौरपदाचे वर्षे झाल्याने मोहिनी लांडे यांना नारळ देण्याची खेळी असावी अथवा आगामी काळात ‘रसद’ पुरवण्यासाठी लांडगेंना अर्थपूर्ण समिती दिली असावी, असे तर्क लढवण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा