पिंपरी : आयकर विभागाने पिंपरी-चिंचवडमधील तीन बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर गुरुवारी छापे मारले. सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक दाखल झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती.पिंपरी कॅम्पातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानी सकाळी आयकर विभागाचे अधिकारी पाच वाहनांमधून दाखल झाले. अधिकाऱ्यांनी घराची झडती घेत तपासाला सुरुवात केली. त्याचवेळी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात देखील काही अधिकारी पोहोचले. निवासस्थानासह कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी सुरू केली. निवासस्थानात कोणाला जाऊ दिले जात नव्हते. पोलीसही तैनात होते.

सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. आयकर विभाग कोणत्या प्रकरणाची चौकशी करत आहे, याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील आयकर विभागाने धाड टाकल्याचे समजते. शहरात एकाच दिवशी आणि एकाचवेळी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे. या छापेमारीची महापालिका बांधकाम विभागातही जोरदार चर्चा होती.

Story img Loader