पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलवर महिला प्रवाशांसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन’ आणि ‘डिस्पोजल मशिन’ ही सुविधाच नसल्याचे उघडकीस आले आहे. महिला प्रवाशांच्या आरोग्याला धोका असल्याने विमानतळ यंत्रणेने यात लक्ष घालण्याची प्रवाशांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर, ‘नवीन टर्मिनलवरील महिलांच्या स्वच्छतागृहात लवकरच मशिन बसविण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचा सध्या पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे ८० टक्के विमानांची उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होत आहेत. येथे ‘दिशा’ प्रकल्पांतर्गत सुविधा देण्यात येणार असून, त्यात ही मशिन उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत.

जुन्या टर्मिनलवरील महिलांच्या स्वच्छतागृहात ही मशिन उपलब्ध आहे. मात्र, नवीन टर्मिनलवर महिला प्रवाशांसाठी ही मशिन लावण्यातच आले नसल्याचे उघडकीस आले आहे.

‘मी स्वत: लोहगाव विमानतळावरून प्रवास करण्यापूर्वी नवीन टर्मिनलवरील स्वच्छतागृहात गेले असता, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग वा डिस्पोजल मशिन आढळून न आल्याने त्रास झाला. विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना दिली असता, जुन्या टर्मिनलवरील स्वच्छतागृहात जाण्यास सांगण्यात आले,’ असे एका महिला प्रवाशाने सांगितले.

विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर महिलांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये २० ते २२ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि तेवढ्याच प्रमाणात डिस्पोजल मशिन सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. – संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ