अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणारा स्मशान परवाना घेण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे जायचे असेल, तर सकाळी आठ ते रात्री नऊ याच वेळात जावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पुरेसे मनुष्यबळ असूनही आरोग्य निरीक्षकांनी तिसऱ्या पाळीमध्ये कर्मचाऱ्याची नियुक्ती न केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी स्मशान परवाना मिळण्यात अडचणी येत आहेत.
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान परवाना अत्यावश्यक असतो. पूर्वी विश्रामबागवाडा येथील जन्म-मृत्यू कार्यालयासह शहरातील सर्व जकात नाक्यांवर स्मशान परवाना उपलब्ध होत असे. मात्र, जेथे अंत्यसंस्कार होतात, त्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये हा स्मशान परवाना मिळत नव्हता. आमदार गिरीश बापट यांच्या पुढाकाराने ही उणीव दूर करून ३१ डिसेंबर २००७ रोजी वैकुंठामध्ये स्मशान परवाना देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक त्या सुविधा उत्तम पद्धतीने देणारी स्मशानभूमी म्हणून वैकुंठ स्मशानभूमीचा आशिया खंडामध्ये लौकिक झाला.
वैकुंठ स्मशानभूमी येथे स्मशान परवाना घेतला, तर अंत्यसंस्कार झालेल्या पार्थिवाचा मृत्यू दाखला (डेथ सर्टिफिकेट) चार दिवसांनी तेथेच मिळतो. ही सुविधा केवळ वैकुंठ स्मशानभूमी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची माहिती असल्यामुळे स्मशान परवाना येथे घेण्यालाच पसंती दिली जाते. सध्या सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळात दोन पाळ्यांमध्ये स्मशान परवाना मिळतो. पाच कर्मचारी हे काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांची रात्रपाळीमध्ये काम करण्याची तयारी आहे. मात्र, असे असतानाही केवळ रात्री फारशी वर्दळ नसते अशी सबब पुढे करून ही सुविधा बंद करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी रात्री वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आलेल्या नातेवाइकांना स्मशान परवाना देणाऱ्या कार्यालयाचे टाळे पाहावे लागत आहे. अशा वेळी विश्रामबागवाडा येथील कार्यालयातून स्मशान परवाना आणल्यानंतरच अंत्यसंस्कार होतात. या प्रक्रियेमध्ये विलंब तर होतोच. पण, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातलगांना तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे स्मशान परवाना देण्याची सुविधा ही २४ तास उपलब्ध असली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा