पुणे : शहरातील वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची शिवाजीनगर येथील स्थानके जोडण्यासाठी पादचारी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन कोटींचा खर्च अपेक्षित असून, पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे.
पुण्यातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट तसेच पीएमआरडीएचा शिवाजीनगर-हिंजवडी हे तिन्ही मार्ग शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. महामेट्रो आणि पीएमआरडीएच्या मेट्रो स्थानकामध्ये दीडशे मीटरचे अंतर आहे. स्थानके भिन्न ठिकाणी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरणार आहे. या दोन्ही स्थानकांवर ये-जा करण्यासाठी प्रवाशांना स्थानकावरून खाली उतरून पुन्हा दुसऱ्या स्थानकात जावे लागणार आहे.
हेही वाचा – राज्यात आतापर्यंत सर्वांत कमी पाऊस सांगलीत; ‘हे’ जिल्हेही कोरडे
हेही वाचा – पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील ‘पुण्यदशम्’ची सेवा खंडित
ही बाब लक्षात घेऊन पुणे मेट्रो आणि पीएमआरडीएची मेट्रो यांच्या स्थानकांना जोडण्यासाठी पादचारी मार्ग केला जाणार आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुणे महापालिका आणि पीएमआरडीए पन्नास-पन्नास टक्के खर्चातील वाटा उचलणार आहे. या पादचारी मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांची गैरसोयही टाळली जाणार आहे.