लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जन्म-मृत्यू नोंदणी आणि दाखले देण्यासाठीची ऑनलाइन प्रणाली बिघडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत केंद्राकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्यात अद्यापही सुधारणा झालेली नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष त्यामुळे सहन करावा लागत आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी आणि त्याचे दाखले देण्यासाठी संपूर्ण देशात एकच प्रणाली वापरली जात आहे. शहरातील जन्म-मृत्यूची नोंद केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये (सीआरएस) २०१९ पासून केली जाते. या प्रणालीमध्ये काही महिन्यांपूर्वी बदल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत शहरातील कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखले मिळत होते.
आणखी वाचा-नवरात्रातील उपवासकाळ असूनही केळ्यांना मागणी कमी
मात्र, २४ जूनपासून ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली आहे, तेथेच त्यांना दाखला मिळत आहे. याचा फटका अनेक नागरिकांना बसत आहे. नागरिकांना क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. सर्व्हर बंद पडणे, कामकाज हळू होणे अशा अडचणी समोर येत आहेत. दाखल्यांसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. नवीन दाखल्यांसाठी नोंदणीचे कामही संथ गतीने होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडत आहे.
जन्म-मृत्यू नोंदणीच्या प्रणालीमध्ये निर्माण झालेल्या अडचणींबाबत दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील डॉक्टरांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यात सुधारणा झालेली नाही. मंगळवारी पुणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील ही यंत्रणा ठप्प झाली होती. पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला.
आणखी वाचा-तपासाच्या व्याप्तीत वाढ बोपदेव घाट प्रकरणी सराइत लुटारूंची चौकशी; आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके
महानगपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांना जन्म आणि मृत्यू चे दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात जन्म अथवा मृत्यू झाल्यानंतर त्याची प्राथमिक नोंदणी संबधित रुग्णालयात होते. त्यानंतर ही माहिती महापालिकेच्या कार्यालयाकडे होते. तेथे त्याची नोंदणी झाल्यानंतर दाखला दिला जातो. दाखल्यासाठी नागरिकांना आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात महापालिकेचा अर्ज भरून द्यावा लागतो.
पहिली प्रत मिळते मोफत
हा अर्ज भरताना आवश्यक ती माहिती बिनचूक भरावी लागते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी दाखला तयार करतात. मराठी भाषेसह आवश्यकता असल्यास इंग्रजी भाषेत देखील जन्म मृत्यू चे दाखले मिळू शकतात. यासाठी अर्ज भरताना संबधित अर्जदारांना ही माहिती द्यावी लागते. एकदा दाखला तयार झाल्यानंतर त्यामध्ये बदल होत नसल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. दाखल्याची पहिली प्रत नागरिकांना मोफत दिली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक प्रतीसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते.