इंदापूर : इंदापूर व करमाळा तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्र परिसरातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव , काळेवाडी, चांडगाव, अगोती,वरकुटे ,कालठण,पडस्थळ, माळवाडी ,शिरसोडी,गंगावळण ,कळाशी तर करमाळा तालुक्यातील वाशिंबे, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, गुलमोहरवाडी येथील शेतकरी ऊस पिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहेत. उजनी पाणलोट परिसरातील पारंपारिक ऊस क्षेत्रावरील आडसाली ऊस मोडून शेतकरी केळी लागवड करायला पसंती देत आहेत.ऊस पिकासाठी येणारा खर्च जास्त असला तरी केळी पिकाचे पैसे लवकर मिळतात .तर उसाचे पैसे वेळेवर मिळतील याची शाश्वती नाही.
करमाळा तालुक्यात ऊसाचे गाळप करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्यातील चारही कारखाने बंद असल्याने तालुक्याबाहेरील खाजगी वा सहकारी कारखान्याची मनधरणी करावी लागत आहे. ऊस तोडणी मजूर ही ऊस तोडणी साठी शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे मागत आहेत . अशा अनेक कारणांमुळे शेतकरी केळी पीकाच्या लागवडीकडे वळाले आहेत. उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र आता केळीच्या ‘आगार’ म्हणून नावारूपाला आले आहे.गेल्या तीन महिन्यापूर्वी केळीला किलोला ३३ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे केळी पीक तोट्यात जात नाही. हा केळी उत्पादकांना भरोसा आला आहे.सध्या केळीला २० रुपये दर मिळत असला तरी यापुढे निश्चितच केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
करमाळा तालुक्यात सर्वप्रथम सुरुवातीला उजनी बॅकवॉटर परिसरातील कंदर भागातील शेतकऱ्यांनी केळी पिकाला पसंती दिली व त्यापासून ते केळी उत्पादकांना चांगला फायदा मिळाला.त्यानंतर पश्चिम भागातील वाशिंबे परिसरात केळी पिकाचे क्षेत्र वाढले व पश्चिम भागही केळीचे आगार झाला आहे.पारंपारिकला ऊस पिकाला फाटा देऊन उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ऐल तिरी व पैलतीरावरील परिसरातील शेतकरी केळी पिकाबरोबरच पेरू, पपई, सिताफळ, डाळिंब, कलिंगड, खरबूज या पिकाकडे वळत आहे.केळी पिकामध्ये कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची यासारखे पिके आंतरपिके घेतली जात आहेत.ऊसाप्रमाणेच केळी पिकालाही कोणतीही रोगराई नसली तरी वादळ वारे हे नैसर्गिक संकट मात्र मोठे आहे.
इंदापूर,करमाळा तालुक्यातील केळीची प्रत चांगली असल्याने आखाती देशातून जळगाव मधील केळी पेक्षा जास्त मागणी आहे.त्यामुळे दर ही मागील तीन ते चार वर्षापासून चांगला मिळत असल्याने शेतकरी ऊस पिकास फाटा देऊन केळी पिकाकडे वळत आहेत.
पीकाचे योग्य नियोजन व काळजीपूर्वक हवामान व ऋतूचा अंदाज घेऊन योग्य वेळी केळीची लागवड करून खतांच्या मात्रा माती परीक्षण करून दिल्यानंतर भरघोस उत्पन्न केळीतून मिळते. ऊसापेक्षा कितीतरी पटीने केळीचे पीक फायदेशीर असल्याने अलीकडच्या काळामध्ये आम्ही केळी पिकाकडे वळालो . – प्रविण गणपत काळे,माजी उपसरपंच पळसदेव ग्रामपंचायत